Menu Close

प्रवास छायाविष्कारचा – भाग १

प्रवास छायाविष्कारचा – भाग १

मला आठवतंय २०१३ साल, गणपती आधी साधारण १५-२० दिवस मी, हृषीकेश, समीर आणि संकेत आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर (समुद्रवर) या वेळेस गणपतीत काय नवीन करता येईल ह्याची चर्चा करत होतो. बरच चर्वाचर्वण झाल्यानंतर अचानक हृषीकेश च्या डोक्यात छायाचित्रण स्पर्धेबाबत कल्पना सुचली. ह्यामागची संकल्पना अशी होती की गणपतीच्या काळात खूप सारे फोटो काढले जातात, पण ते सर्वांना पाहण्यासाठी एक सामाईक मंच असा कुठे उपलब्ध नव्हता तसेच नव्या व हौशी फोटोग्राफर्सना ही त्यांच्या कॆमेरातुन त्यांनी बघितलेल जग दाखवण्याची संधी उपलब्ध व्हावी हा एक हेतू.

आमच्यातले काहीजण हौशी फोटोग्राफर्स आहेत. पण स्पर्धेसाठी नक्की काय काय कराव लागेल ह्याचा अंदाज तसा कोणालाच नव्हता. कल्पना तर उत्तम होती. मग त्याच्यावर आम्ही थोडं काम करायला सुरवात केली. स्पर्धेसाठी काय विषय असावेत ह्यावर मंडळातील अजून लोकांबरोबर चर्चा झाल्यावर – सहाजिकच स्पर्धा गणेशोत्सव काळात होणार म्हटल्यावर “सार्वजनिक गणेशोत्सव” हा विषय पक्का ठरला. पण ह्याच जोडीला गणशोत्सव हा ज्या लोकांच्या (पोलीस, महानगरपालिका कर्मचारी इ.) सहकार्यामुळे शक्य होतो अशा लोकांना अभिवादन करण्यासाठी – “मेन ऑन ड्यूटी” असा विषय ठरला. खरा प्रश्न तर पुढेच होता की स्पर्धेसाठी नांव नोंदणी कशी व कुठे करून घ्यायची. १० दिवस उत्सव मंडपात नाव नोंदणी तर होतीच शिवाया मंडळाचे हितचिंतक “पूना बेकारी” व “व्हीनस ट्रेडर्स” ह्यांची मदत झाली. ह्यांनी आपल्या सर्व शाखांमध्ये नाव नोंदणी करून घेण्यास तयारी दर्शवली. स्पर्धा म्हणली की परीक्षक तर आलेच. तेव्हा मी माझ्या एका मित्राला परीक्षणाबद्दल विचारला होत, तेव्हा त्यांनी सौमित्र इनामदारचा नंबर दिला. पण काही कारणामुळे सौमित्र बरोबर संपर्क होऊ शकता नव्हता. हे सगळं होत असतानाच आम्ही ह्या स्पर्धेबद्दल मंडळाच्या फेसबुक पेजवरून घोषणा केली. सगळ्यांच्याच मनात धाकधूक होती, काय होईल , कसा प्रतिसाद मिळेल ?

अशातच आमची उत्सवाची देखील कामे चालू होती आणि बघता बघता उत्सव चालू पण झाला. उत्सवाच्या काळात बरेच फोटोग्राफर्स बाहेर पडतात. असे जे कोणी फोटोग्राफर्स मंडपात येत होते त्या सर्वांना आम्ही या स्पर्धेविषयी माहिती देत होतो. साधारण आम्ही रोज किती नाव नोंदणी झाली याचा आढावा घेत होतो. पण पहिल्या ४ दिवसात आकडा फार काही बरा नव्हता. पण आम्ही आशादायी होतो. बाप्पा आपल्या प्रामाणिक मेहनतीला नेहमीच यश देतो हे कुठेतरी मनात होत आणि अजूनही आहे. मगाशी सांगितलं तस सौमित्रशी काही संपर्क होऊ शकला नव्हता. पण मी त्याच फेसबुक पेज बघून ठेवल होत. साधारण उत्सव संपायच्या आधी २ दिवस सौमित्र रात्री १०.३० वाजता मंडपात फोटो काढायाला आला होता. बरोबर बहुतेक चैतन्य खिरे होता. जणू काही बाप्पांनीच त्याला पाठवलं. 🙂. तिथेच आमच बोलणं झाले. आमची तशी काही आधीची ओळख नाही. पण त्याला विचाराल आणि त्यांनी स्पर्धेच्या परीक्षणासाठी होकार दिला. आणि आमच्या स्पर्धेला परीक्षक मिळाला तसेच उत्सव संपता संपता आम्ही नाव नोंदणी मध्ये शंभरी गाठलीच!!!

अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला होता. लोकांनी दोन्ही विषयांकरिता फोटोस पाठविले होते. आता आमची जबाबदारी वाढली होती. त्या फोटोंचा प्रदर्शन भरवायच होत. चौकशी केल्यावर कळाले की महानगरपालिकेचे कलादालन कमीत कमी ३ महिने आधी आरक्षित करावे लागते. आणि बालगंधर्व कलादालन आणि राजा रवी वर्मा कलादालन उपलब्ध नाहीत. त्याचदरम्यान समीरने पं. भीमसेन जोशी कलादालनला एका प्रदर्शानानिमित्त भेट दिली होती. सुदैवाने हे कलादालन उपलब्ध झाले व प्रदर्शनाची तारीख निशचीत झाली – १९,२० ऑकटोबर २०१३. बघता बघता प्रदर्शनासाठी फोटो प्रिंट करून आले. प्रत्येक फोटोसाठी फोटोग्राफरची नावाची पट्टी पण तयार झाली. १८ ऑकटोबर ला संध्याकाळी आम्ही मंडळाचे सर्व कार्यकर्ते कलादानावर पोहचलो. सगळ्याना तसा हा अनुभव नवीनच होता. सर्वजण उत्साहानी काम करत होते. तरी सगळे फोटो लावून उद्धाटनाची तयारी पूर्ण करायला रात्रीचे ११ वाजून गेले.

उद्घाटनाला मा. आमदार गिरीष बापट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर पारितोषिक वितरण समारंभाला मा.श्री. कुमार गोखले प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कुमार सरांनी उद्घाटनाच्या दिवशी पण आवर्जून उपस्थिती लावली. आलेल्या स्पर्धकांबरोबर ते चर्चा करत होते, त्यांना मार्दर्शन करता होते. पारितोषिक वितरणाच्या दिवशी सौमित्रने परीक्षणाविषयी अनुभव सांगितला. एकूणच प्रदर्शनालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. सगळा कार्यक्रम संपल्यावर जाता जाता कुमार सरांनी ह्या उपक्रमाचे खूप कौतुक केले आणि हक्कानी सांगितलं पुढच्या वर्षी पासून मी तुमच्या टीमचा भाग म्हणून येण्याऱ व काम करणार. अशा लोकांचे आशीर्वाद मिळत राहणं आणि ह्या लोकां बरोबर काम करायला मिळणं हीच आपल्या कामाची पोचपावती असते अस मला वाटतं. ह्या सर्व कामाचा आनंद व समाधान घेऊन व पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजून चांगल्या स्वरूपात कशी आणता येईल ह्याच विचारात आम्ही सर्वजण घरी गेलो !!!
-विनायक सामक

1 Comment

 1. Rahul Wagh

  प्रवास छायाविष्कारचा – भाग १
  Khup chan pravas ahe ha,
  Changali mane ekatra ali ki kiti sundar karya hou shakate hey ya pravasatun disate.
  Vinayak chan lihila ahes lekh,
  keep it up.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *