प्रवास छायाविष्कारचा – भाग २

प्रवास छायाविष्कारचा – भाग २
आता २०१३ सालच्या छायाचित्रण स्पर्धेचा अनुभव गाठीशी होताच. त्यामुळे दुसऱ्या वर्षी म्हणजेच २०१४ साली स्पर्धेसाठी तयारी आम्ही जरा लवकरच सुरु केली. पहिल्या वर्षी स्पर्धेला असा काही नाव नव्हत. पण ह्या स्पर्धेची ओळख निर्माण व्हावी ह्या दृष्टीने स्पर्धेसाठी काहीतरी नाव असावे असा विचार सगळ्यांच्याच मनात येत होता. शेवटी हा छायाचित्रांचा होणारा आविष्कार म्हणून “छायाविष्कार” असे नाम:करण करण्यात आले. पहिल्या वर्षी छायाविष्कारचे विषय आम्हीच ठरवले होते. पण ह्या वर्षी विषय आम्ही परीक्षकांबरोबर बैठक घेऊन ठरवले. आणि अर्थातच परीक्षक होते सौमित्र इनामदार आणि कुमार गोखले सर. विषय ठरवताना ही स्पर्धा गणेशोत्सवा पुरती मर्यादित न ठेवता अजूनही विषय घ्यावेत असा एकूणच सगळ्यांचा मतप्रवाह होता जेणेकरून स्पर्धेची व्यापकता अजून वाढेल व आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकू. त्यामुळे “सार्वजनिक गणेशोत्सव”, “पोट्रेट फोटोग्राफी” व “पुणे – एक ऐतिहासिक शहर” असे विषय ठरले. मागच्या वेळचे नाव नोंदणीचे शतक ह्यावेळेस द्विशतकात रूपांतरित करायचे आव्हान घेऊनच आम्ही मैदानात उतरलो होतो. ह्यावेळेस बालगंधर्व कलादालन प्रदर्शनाच्या ३ महिने आधीच जाऊन आरक्षित करून ठेवले. पहिल्या वर्षी झालेली स्पर्धेची लोकप्रियता आम्हाला दुसऱ्या वर्षी नक्कीच उपयोगात आली.
जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचण्यासाठी आम्ही फेसबुक, व्होट्सएप, ट्विटर इ. माध्यमांचा उपयोग केला तसेच पोस्टर्स छापून ती विविध महाविद्यालयात जाऊन लावली. ह्या सगळ्याची परिणीती म्हणजे छायाविष्कार ला  मिळालेला वाढता प्रतिसाद!!!
प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे ठरवतानासुद्धा ते पुण्याशी निगडीत नामवंत व्यक्ती असावेत असा प्रयत्न आम्ही करत असतो. ह्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून उद्घाटन सोहळ्याला पक्के पुणेकर मा. डॉ. सतीश देसाई ह्यांना निमंत्रित केले होते तसेच पारितोषिक वितरण समारंभाला आनंदगंधर्व मा. आनंद भाटे हे प्रमुख पाहुणे लाभले होते. दुधात साखर म्हणजे अभिनेता सौरभ गोखले सूत्रसंचालक म्हणून लाभला. ह्या वर्षी प्रदर्शन होते २० ते २२ सप्टेंबर २०१४. मागच्या वर्षीच्या शिकवणीतून आम्ही सर्व कामे वाटून घेतली होती. त्यामुळे यावर्षी कामाचा ताण तसा जाणवला नाही. 
कितीही नाही म्हणल तरी कुठलाही उपक्रम हाती घेताना त्याची आर्थिक गणितं सोडवावीच लागतात. पहिल्या वर्षी आम्ही प्रायोगिक तत्वावर म्हणून प्रवेश शुल्क  रु. ५०/- ठेवले  होते. पण कमीत कमी फोटो छपाईचा तरी खर्च निघावा म्हणून ह्या वर्षी पासून प्रवेश शुल्क  रु. १००/- केले होते. वाढते प्रवेश शुल्क असून सुद्धा नाव नोंदणीचा प्रतिसाद कमी झाला नव्हता. आम्ही नाव नोंदणीचे द्विशतक जवळ जवळ गाठलेच!!  
फोटो प्रिंटिंगचा खर्च प्रवेश शुल्कामधून निघत होता. पण उर्वरित सर्व खर्च मंडळ उचलत होते. मंडळावरचा हा आर्थिक भार कमी करण्यासाठी आम्ही प्रायोजकाच्या शोधात होतो. तेव्हा ‘डिजिटल फेंटासी’ चे अनिल फेरवाणी यांनी स्पर्धेसाठी तृतीय पारितोषिक प्रायोजित करण्याचे मान्य केले व आम्हाला थोडासा दिलासा मिळाला. तसेच ह्या दोन वर्षात आम्हाला स्पर्धकांकडून काही सूचना पण मिळाल्या व आमच्याही डोक्यात काही नवीन कल्पना होत्या. ह्या सगळ्यावर काम करून छायाविष्कार २०१५ अजून वेगळ्या स्वरूपात आणण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊनच आमची छायाविष्कार २०१४ ची सांगता झाली!!!
-विनायक सामक

Leave a Reply