प्रवास छायाविष्कारचा – भाग ३

प्रवास छायाविष्कारचा – भाग ३
छायाविष्कारची  घडी आता तशी नीट बसली होती. काय काय कामे कशी आणि कोणी करायाची हे प्रत्येकाला माहिती होते. त्यामुळे तशी नकळतपणेच छायाविष्कार – २०१५ ला सुरवात झाली. “छायाविष्कार” ची अजून ठळक ओळख निर्माण व्हावी म्हणून कुमार सरांनी आम्हाला “छायाविष्कार” चा लोगो तयार करून दिला. आणि हाच लोगो वापरून आम्ही छायाविष्कारसाठी मानचिन्ह तयार केले. हेच मानचिन्ह दरवर्षी सर्व विजेत्याना प्रमुख पाहुण्यांना देण्यात यावे असा मानस झाला. काहीतरी नवीन करायच हे सतत डोक्यात चालूच होत. ह्याचाच एक भाग म्हणून आम्ही छायाचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करायचा प्रयत्न करावा असं ठरवल. आणि ह्याच प्रयत्नाचा एका भाग म्हणून आम्ही स्पर्धेसाठी २ विषय व समाज प्रबोधनासाठी दोन विषय असे एकूण चार विषय निवडले. स्पर्धेसाठी – “सार्वजनिक गणेशोत्सव”, “वाईल्ड लाईफ” तसेच समाज प्रबोधनासाठी – “सकूल चले हम” व “पुण्यातील वाहतूक” असे विषय ठरले. प्रवेश शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन प्रवेश शुल्क पद्धतीची पण सुरवात ह्याच वर्षी सुरु केली. या वर्षी आम्हाला गणेशोत्सवा दरम्यानच छायाविष्कारसाठी प्रमुख प्रायोजक मिळाले. “रिवा” चे श्री. माधव गोडबोले ह्यांनी आम्हाला आर्थिक पाठींबा दिला. त्याचप्रमाणे ह्या वर्षी “महाराष्ट्र टाइम्स” ने माध्यम प्रायोजक होण्याची तयारी दर्शवली. ह्या दोन गोष्टींमुळे आमचा बराचसा भार हलका झाला. ह्या वेळेस प्रदर्शन होते १७ ते १९ ऑकटोबर २०१५ आणि स्थळ होते बालगंधर्व कलादालन. ह्या वेळेस वाईल्ड लाइफ विषय असल्यामुळे श्री. चैतन्य खिरे ह्यांनी सौमित्र व कुमार सरांबरोबर परीक्षण करण्यास अनुकूलता दर्शवली. प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करायचा प्रघात तसाच चालू ठेवून उद्घाटनाला चिंटूकार श्री. चारुहास पंडित व पारितोषिक वितरणाला श्री. सतीश पाकणीकर ह्यांना पाचारण करण्यात आले. काहीतरी नवीन करण्याचा ध्यास आम्हाला शांत बसू देत नव्हता. म्हणूनच ह्या वेळसच्या पारितोषिक वितरण समारंभात आम्ही “ई-प्रदर्शनाचे” उद्घाटन केले. ह्या ई -प्रदर्शनात आलेल्या सर्व फोटोस चा समावेश करण्यात आला होता. “देखणं प्रदर्शन, नेटकं आयोजन!” ही पाकणीकर सरांची प्रतिक्रिया फारच बोलकी ठरली. छायाविष्कारच्या माध्यमातून आमच्या मंडळाशी अनेक लोक जोडले जात होते आणि आम्ही पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणयाचा प्रयत्न करता होतो. प्रदर्शनाव्यतिरिक्त आपण अजुन काहीतरी फोटोग्राफर्स साठी केले पाहिजे ही गोष्ट मनात होतीच. पण ते ह्या वर्षी काही शक्य झाल नाही. पुढच्या वर्षीसाठी ही गोष्ट आमच्या “टू डू लिस्ट” मध्ये ठेवून “छायाविष्कार २०१५” चा निरोप घेतला!!!
-विनायक सामक

Leave a Reply